Headlines

जिल्हा उद्योग केंद्राच्या आयटी प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी, ता.०५-:
जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गवाणकर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवउद्योजकांसाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी शिंगटे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेच्या माध्यमातून युवकांनी स्वावलंबी होऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर यांनी एमसीईडीच्या कार्यपद्धतीची माहिती देत उद्योजकता विकासासाठी केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारण्याचा सल्लाही त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिला.
यावेळी उद्योग अधिकारी शिंगटे, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर, रोहित परब तसेच गवाणकर कॉलेजचे प्रा. शैलेश गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय एमसीईडीच्या समन्वयक सुषमा साखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page