‘इथे ओशाळला मृत्यू’ने रंगणार शौर्याचा जागर:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण; शरद कृषी भवनात ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण..
⚡ओरोस ता २-: विकासकामांच्या लोकार्पणाचा उत्सव आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा उलगडणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग असा अनोखा संगम सोमवारी (ता. ३) सिंधुदुर्गनगरीत अनुभवायला मिळणार आहे. नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाच्या वतीने विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शरद कृषी भवन येथे सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, सदस्या सुप्रिया वालावलकर, प्राधिकरण सदस्य महेश पारकर यांच्यासह ओरोस, रानबांबुळी आणि अणाव ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा
लोकार्पण सोहळ्यानंतर शिवगणेश प्रॉडक्शन्स, सिंधुदुर्ग-मुंबई निर्मित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची गाथा रंगमंचावर साकारली जाणार आहे. विकासकामांच्या लोकार्पणासोबतच ऐतिहासिक शौर्यगाथेचा सांस्कृतिक आविष्कार असा दुहेरी अनुभव या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
