Headlines

झाराप, इन्सुली व बांदा येथील फ्लायओव्हरचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट करा…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणी
पावसाळ्यात पुलांवर भगदाडे पडत असल्याचा दावा;नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर..

⚡सावंतवाडी, ता.०२-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप, खामदेव नाका (इन्सुली) आणि बांदा येथील फ्लायओव्हर पुलांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या तिन्ही पुलांचे स्वतंत्र (थर्ड पार्टी) स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू असून, एवढ्या मोठ्या कालावधीनंतरही अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर, चिपळूण आणि माणगाव परिसरातील अनेक फ्लायओव्हरचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अपेक्षित प्रमाणात वाहतूक नसतानाही झाराप, खामदेव नाका (इन्सुली) आणि बांदा येथे भविष्यातील वाहतुकीचा विचार करून फ्लायओव्हर उभारण्यात आले. मात्र, हे पूल अद्याप वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. अशातच पावसाळ्यात या पुलांवर भगदाडे पडल्याचे दिसून येत असून ती प्लास्टर करून बुजवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
देशात विविध ठिकाणी पुलांच्या दुर्घटना घडून जीवितहानी झालेल्या घटना पाहता या पुलांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या तिन्ही फ्लायओव्हरचे स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन झाराप, खामदेव नाका (इन्सुली) व बांदा येथील फ्लायओव्हर पुलांचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page