*कोविड सेंटरचे काम सुरू असल्याची माहिती उपनगराध्यक्षाना नसणे शोकांतिका; नगराध्यक्षाची टीका*
*💫मालवण दि.०१-:* मालवणात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी करणारे पत्र मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगरपालिका कार्यालयात दिले असले तरी असे कोणतेही पत्र मला आज पर्यंत मिळालेले नाही असे सांगत मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपनगराध्यक्ष यांनी मागणी करण्यापूर्वीच चार दिवस अगोदर शहरात कोविड केअर सेंटरचे काम सुरू आहे जी गोष्ट सर्वांना माहीत आहे त्याची माहिती उपनगराध्यक्ष यांना नसणे म्हणजे शोकांतिका असल्याची टीका श्री. कांदळगावकर यांनी केली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण ग्रामीण रुगणलयाच्या नजीक असणाऱ्या नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरच्या कामाची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पाहणी केली. तसेच जय गणेश इंग्लिश स्कुल मध्ये ५० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांना उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगरपालिकेला पत्र लिहून १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याच्या केलेल्या मागणीबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. उपनगराध्यक्ष वराडकर यांचे कोणतेही पत्र मला मिळालेले नाही. तरी त्यांच्या भावना मला पोहचल्या आहेत. नगरपालिकेकडून गेले चार दिवस कोविड केअर सेंटरचे काम सुरू असून याबाबत उपनगराध्यक्ष वराडकर यांना माहिती नसणे ही शोकांतिका आहे. मी स्वतः नगरपालिकेत असताना मला भेटून मागणी करण्याऐवजी नगरपालिकेच्या टपालात पत्र देण्याचे कारण काय ? उपनगराध्यक्ष असणाऱ्या वराडकर यांनी नगरपालिकेच्या सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी. २० बेडच्या कोविड सेंटर बरोबरच ५० बेडचे संस्थात्मक विलगिकरण केंद्रही सुरू होणार आहे. उपनगराध्यक्ष वराडकर यांनी कोविड सेंटरच्या ठिकाणी येऊन सेंटरची माहिती घ्यावी, असेही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर म्हणाले.
