*रेवडी सरपंच प्रिया कांबळी यांचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा*
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील रेवंडी येथील नदी खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून मातीचा भराव टाकून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात रेवंडी ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलन छेडून तसेच याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले असताना गेल्या पाच महिन्यात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नदी खाडी पात्रातील ते अनधिकृत भरावाचे काम त्वरित काढून टाकण्यात यावे, अन्यथा रेवंडी ग्रामस्थ खाडीत जलसमाधी घेतील असा इशारा रेवंडीच्या सरपंच सौ. प्रिया कांबळी यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. रेवंडी खाडीपात्राच्या किनारी कांदळवन तोडून जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात होता. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका रेवंडी गावाला असण्याची भीती आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला, प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. शासकीय पंचनामे होऊन कांदळवन व बंधारा तोड झाल्याचे स्पष्टही होऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने महिन्याभरापूर्वी रेवंडी ग्रामस्थानी ग्रामस्थांनी चक्क खाडीपात्रात उतरून आंदोलन केले. त्यावेळी यावेळी सदरच्या अतिक्रमणावर महसूल प्रशासन वनविभाग व पतनविभाग यांच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले होते. त्यामुळे ग्रामस्थानी आपले आंदोलन स्थगित करत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हे अतिक्रमण सुरू होऊन पाच महिने पूर्ण झाले तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याने सरपंच सौ. प्रिया कांबळी यांनी पुन्हा एकदा तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे. दि. २२ मे २०२१ पासून पुन्हा खाडी पात्रात मातीचा भराव टाकण्याचे काम संबंधितांनी सुरू केले आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनधिकृतपणे सुरू असलेले खाडी पात्रात भराव टाकण्याचे काम त्वरित हटविण्यात यावे. तसे न केल्यास रेवंडी ग्रामस्थ त्याठिकाणी जाऊन जलसमाधी घेतील, कायदा हातात घेतल्यास त्यास पोलीस व महसूल प्रशासन जबाबदार राहील, रेवंडी ग्रामपंचायत, सरपंच व ग्रा. प., सदस्य यास जबाबदार राहणार नाहीत, असे सरपंच सौ. कांबळी यांनी सांगत याबाबत लवकरात लवकर याबाबत लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणीही सौ. कांबळी यांनी केली आहे.
