पहिल्या २० बेडचे काम अंतिम टप्प्यात;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती
*💫मालवण दि.०१-:* मालवण ग्रामीण रुग्णालयानजीकच्या मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या २० बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू असून नगरपालिकेतर्फ़े या सेंटर मध्ये सर्व व्यवस्था उभी करण्यात आली आहे. तर धुरीवाडा येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ५० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येत असून त्याठिकाणी कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे. लवकरात लवकर ही केंद्रे सुरू करून कोरोना रुग्णांना चांगले उपचार देण्यात येतील, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी या केंद्रांच्या पाहणीदरम्यान सांगितले. मालवणात होणाऱ्या कोविड केअर सेंटर व विलगिकरण केंद्राच्या कामाची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्यासमवेत पाहणी केली. या पाहणीवेळी नगरपालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. कोविड केअर सेंटर मध्ये २० बेड असून आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सेंटर मध्ये ५० ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता असणार असून कोरोनाग्रस्त रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येतील, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले. यावेळी जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात येत असलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्राचीही पाहणी करण्यात आली. प्रशालेचा सभागृह तसेच दोन वर्गखोल्या यात ५० बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक व सौम्य लक्षणे असतील त्यांना या केंद्रात ठेवण्यात येणार आहे, ज्यांना ऑक्सिजनबाबत व इतर तीव्र लक्षणे जाणवतील त्यांना कोविड केअर सेंटरला हलविण्यात येईल, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सांगितले.
