Headlines

सावंतवाडी येथे श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२५-:
गेली पाच वर्षे श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्था ही सातत्याने ‘ऑडिट अ’ वर्गामध्ये येत असून ठेवीदारांचा पतसंस्थेवर असणारा विश्वास कायम आहे. हा विश्वास पुढेही असाच कायम ठेवण्याच्या दृष्टीने पतसंस्थेने भावी पिढीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्धार केला आहे. तसेच संचालक मंडळाच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज आम्ही देत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी केले. सावंतवाडी येथील समाज मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या पतसंस्थेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.

सभेच्या सुरुवातीला सातार्डा येथील माजी सैनिक चंद्रकांत पवार आणि त्यांच्या पत्नी चंद्रावती पवार तसेच पतसंस्थेचे मयत सदस्य व नातेवाईकांना दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मागील अधिमंडळ वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन करून सभेची सुरुवात झाली. सभेमध्ये तेरीजपत्रक, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी-अधिक झालेल्या खर्चालाही सभागृहाने मंजुरी दिली. केंद्राच्या सहकार खात्याच्या सूचनेनुसार संस्थेची हिशोब तपासणी झाली असून, हिशोब तपासणीस म्हणून तिसऱ्या वर्षीही लेखापाल व्ही. बी. शिरोडकर यांना कायम करण्याचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. यासोबतच सुधारित आदर्श उपविधीसही मंजुरी देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष गोविंद वाडकर यांनी सन २०२५ ते २६ या वर्षाची नफा विभागणी मांडत, संस्थेला एकूण ३ लाख ८३ हजार ३६८ रुपये नफा झाल्याचे जाहीर केले. लवकरच पतसंस्थेचे सुसज्ज कार्यालय सावंतवाडी शहरामध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या प्रसंगी २००३ पासून आतापर्यंत पगार किती मिळतो याकडे न पाहता पतसंस्थेला अविरत सेवा देणारे व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करून गौरव करण्यात आला. संचालक परशुराम चव्हाण यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पतसंस्थांच्या बदलांबद्दल बोलताना अध्यक्ष वाडकर म्हणाले की, “सहकारी बँकांना लावण्यात आलेले आरबीआयचे नियम आणि नियमावली आता पतसंस्थांनाही लागू करण्यात आली असून पतसंस्था सुद्धा बँकांच्या बरोबरीने आल्या आहेत. त्यामुळे एकसूत्रीपणासाठी आता पतसंस्थांच्या खात्यातील रकमा शासनाकडून वापरल्या जाऊ शकतात.” केंद्रीय सहकारी कायद्यानुसार आपल्या पतसंस्थेचे ऑडिट झाले असून यामुळे पतसंस्थेचा पाया अधिक मजबूत झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्वसाधारण सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, संचालक परशुराम चव्हाण, मंगेश कदम, संगीता वाडकर, सुलोचना वाडकर यांच्यासह मनोहर वेंगुर्लेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण, नरेश कारीवडेकर, क्लार्क दशरथ वाडकर, पिग्मी प्रतिनिधी नारायण केसरकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष गोविंद वाडकर यांनी मानले.

You cannot copy content of this page