बांदा/प्रतिनिधी
दैनिक ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक आणि कलावंतांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता, सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे महेश्वर तेटांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात ग्रामीण भागातील पत्रकार, मुक्त वार्ताहर, साप्ताहिक-पाक्षिकांचे प्रतिनिधी तसेच डिजिटल माध्यमातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी ‘स्वाभिमान लेखणी’, ‘शब्दवेध गौरव’, ‘अजेय लेखणी’, ‘कलम-रत्न’, ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ आदी विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
गेली तेवीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री मोरजकर यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहिताच्या पत्रकारितेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि विकासात्मक विषयांना सातत्याने प्राधान्य देणे, ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये मानली जातात.
पत्रकारितेबरोबरच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असून, ते श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीनिमित्त अनेक नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. ते नट वाचनालय, बांदाचे उपाध्यक्ष असून, बांदा मराठा समाजाचे संस्थापक म्हणूनही त्यांनी समाज संघटन आणि सामाजिक उपक्रमांत मोलाची भूमिका बजावली आहे.
श्री मोरजकर यांच्या कार्याची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘भास्कर भूषण अवॉर्ड’ त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. तसेच ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, पंढरपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
आता जाहीर झालेल्या ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कारामुळे त्यांच्या पुरस्कारांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो:-
पासपोर्ट.
‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर
