अध्यक्षपदी भाऊ वाळके यांची बिनविरोध निवड
⚡बांदा ता.२८-: सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर, बांदा (बांद्याचा बाप्पा) मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. सभेत सन २०२६ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रामचंद्र दत्ताराम (भाऊ) वाळके, उपाध्यक्षपदी निलेश (पापू) कदम, सचिवपदी गौरव नाटेकर आणि खजिनदारपदी निखिल मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सभेत मंडळाच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. बांदा स्मशानभूमी शेड उभारणीसाठी मंडळाने दिलेल्या १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीबद्दल तसेच झोळंबे येथील एका गरजू रुग्णाला रुग्णसेवा उपक्रमांतर्गत २१ हजार रुपयांची तातडीची मदत केल्याबद्दल मंडळाच्या कार्याचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
यंदाच्या गणेशोत्सवात ११ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर तसेच शेतकऱ्यांसाठी काजू व सुपारीच्या कलमांचे वाटप या उपक्रमांचा समावेश असून त्याचे आयोजन जुलै महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊ वाळके यांनी, “यंदाचा गणेशोत्सव सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अधिक भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येईल,” असा विश्वास व्यक्त केला.
उपाध्यक्ष निलेश (पापू) कदम यांनी, “बांद्याचा बाप्पा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून या प्रतिष्ठित मंडळात सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा मी ऋणी आहे,” अशी भावना व्यक्त केली.
फोटो:-
बांदा येथे आयोजित गणेश मंडळ बैठकीत सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
