नगरसेविका अॅड.नीता सावंत यांचा आरोप: रस्त्याच्या कामाची जबाबदारी प्रशासनाची की ठेकेदाराची..? तर ‘पंधरा दिवसांत रस्ते चकाचक’ आश्वासनाचे काय झाले; नगराध्यक्षांना सवाल..
⚡सावंतवाडी ता.२७-:
शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील शिरोडा नाका ते राजा स्वार दुकानापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून अॅड. नीता सावंत कविटकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे. रस्ता खोदकामानंतर टाकण्यात आलेले दगड व बारीक खडी (ग्रीट) यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका अॅड. नीता सावंत कविटकर यांनी केला आहे.
मिलाग्रीस शाळेत सकाळच्या वेळेस मुलांना सोडण्यासाठी जाणाऱ्या पालकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावर साचलेली माती व चिखल यामुळे पादचाऱ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या कामाची जबाबदारी प्रशासनाची की ठेकेदाराची, असा सवाल उपस्थित करत अॅड. सावंत कविटकर यांनी दोघांवर नियंत्रण ठेवण्यात नगराध्यक्ष अपयशी ठरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला.नगराध्यक्षांनी पंधरा दिवसांत सावंतवाडी शहरातील रस्ते चकाचक करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही, अशी टीका करत त्यांनी शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील नागरिकांना नळाच्या पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र पाणीपुरवठ्याची बिले मात्र मोठ्या प्रमाणात आकारली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.”शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांबाबत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण?” असा सवाल करत अॅड. नीता सावंत कविटकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
