आरवली किनारी मिळालेला तो मृतदेह देवगड बंदरातील बेपत्ता खलाशाचा

*💫वेंगुर्ले दि.२९-:* वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह देवगड बंदरात बुडालेल्या बोटीवरील खलाशी प्रकाश काशीराम बिरिद (वय 40 ) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या मृतदेहावर सागर तीर्थ येथे आज सकाळी बिरीद कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आरवली – सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवार 28 मे रोजी सकाळी एक पुरुष जातीचा अनोळखी कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. शिरोडा सागर रक्षक सुरज अमरे व राजाराम उर्फ बाबा चिपकर यांना या मृतदेहाबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना संपर्क केला. वेंगुर्ले पोलिसांना याबाबत कळताच पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, पोलीस हेड कॉ. रंजीता चव्हाण, पोलीस नाईक वाय.एम. वेंगुर्लेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. कुजलेल्या स्थितीत मृतदेह असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तो मृतदेह देवगड समुद्रात बुडालेल्या बोटीवरील खलाशाचा असावा असा अंदाज होता. 16 मे रोजी देवगड समुद्रात ही बोट बुडाली होती. त्या अनुषंगाने वेंगुर्ले पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी सदर मृतदेह खलाशी प्रकाश बीरीद यांचा असल्याचे निष्पन्न झाले. राजापूर येथील प्रकाश यांचे भाऊ प्रशांत आणि चुलत भाऊसंदीप तुकाराम बीरीद यांनी मृतदेहाची ओळख पटविली. अखेर कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रकाश यांच्या मृतदेहावर सागरतीर्थ येते आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही भाऊ, पोलीस नाईक वाय.एम. वेंगुर्लेकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, पोलीस पाटील मेस्त्री, सागर रक्षक सुरज अमरे, राजाराम उर्फ आबा चिंपकर तसेच वैभव चौकेकर, रवींद्र वराडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page