सकल मराठा समाज सिंधुदुर्गतर्फे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सत्कार सोहळा..
⚡सावंतवाडी ता.११-: सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीच्या बाजूला येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत , नगराध्यक्षा सौ श्रध्दा राजे भोसले,तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब, युवराज लखमराजे भोसले,जेष्ठ नेते संदिप कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव केला जातो. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
याशिवाय शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, आत्मविश्वास आणि समाजाशी असलेले नाते अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
“गुणवंतांचा सन्मान हा केवळ व्यक्तीचा गौरव नसून समाजाच्या प्रगतीचा उत्सव आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सोहळ्याला यशस्वी करावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.
