आरोंदा येथे गोकृपा अमृत आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकांचे धडे…

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे :- कृषी विभागाचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०९-: शाश्वत भाणि रासायनिक खतमुक्त शेतीला चालना देण्यासाठी, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी श्री.गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जून रोजी आरोंदा सावरजुवा येथे “गोकृपा अमृत निर्मिती”, भात बियाणे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया याबाबतच्या विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे सत्र उत्साहात संपन्न झाले.

रासायनिक खतांवरील खर्च कमी करून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे व शेतीमधील वाढता खर्च कमी करण्यासाठी “गोकृपा अमृत ” चा वापर करावा तसेच गोकृपा अमृत वापराचे फायदे, कमी खर्चात कसे तयार करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन सहायक कृषि अधिकारी श्रीम.प्रिया तेली यांनी केले. भात बियाणे बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता कशी तपासावी यांचे ही यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

सदर कार्यक्रमाला गावातील महालक्ष्मी समुह, ब्राह्मण पाटेकर समुह व धनश्री समुह गटातील महिला व शेतकरी उपस्थित होते.

कृषि विभागाच्या या उपक्रमामुळे आगामी हंगामात नैसर्गिक शेती पध्दतीचा वापर वाढण्यास मदत होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page