उदय आडेलकर ; प्रकाश गडेकर यांच्यामार्फत 25 हजार रु.स्वखर्चातून पाईपलाईन..
⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा हंगाम तोंडावर आला तरी वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकांना नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने व जुन्या विहिरीवरील पाणीसाठा पूर्णतः कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत शासन स्तराकडे येथील उत्कर्ष कार्यकारिणी समिती अध्यक्ष उदय आडेलकर यांनी गेले महिनाभर कालावधीत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. दरम्यान याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी तातडीने व्हिजिट देत योग्य तोडगा काढत नवीन सार्वजनिक विहिरीचे काम सुरू असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या आडेली श्री देव सोमेश्वर सोसायटी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतला सूचित केले होते. त्यानुसार आडेली श्री देव सोमेश्वर सोसायटीचे चेअरमन व माजी सरपंच प्रकाश गडेकर यांनी तातडीने लक्ष घालून येथील वाडीतील सुमारे 40 कुटुंबाला तत्परतेने पाणीपुरवठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंदाजे 25 हजार रुपये “स्वखर्चातून” पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा आज मंगळवारी दुपारी सुरू करण्यात आला आहे.यासाठी पाईप जोडणीचे काम आडेली ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांमार्फत जिल्हा सभापती रितेश राऊळ, सोमेश्वर सोसायटी चेअरमन प्रकाश गडेकर, स्थानिक पदाधिकारी उदय आडेलकर, पाणीपुरवठा उपअभियंता श्री. शिंदे यांच्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रकाश गडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच याबाबत शासनाकडे मागणीसाठी वेळ देऊन सहकार्य करणाऱ्या अन्य ग्रामस्थांचेही स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
