सावंतवाडी नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करा…

नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी नगरपरिषदेस तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद ही जिल्ह्यातील जुन्या नगरपरिषदांपैकी एक असून तिची स्थापना सन १८७८ मध्ये झाली आहे. सुमारे १४७ वर्षांचा इतिहास असलेल्या या नगरपरिषदेकडे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्या आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, वाढलेले उत्पन्न आणि विविध विकासकामे लक्षात घेता सक्षम व पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मुख्याधिकारी हा नगरपरिषद प्रशासनाचा कणा मानला जातो. नगरपरिषदेचा कारभार, विविध विभागांचे समन्वय, नागरिकांच्या समस्या तसेच विकासकामांचा पाठपुरावा यासाठी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र सध्या प्रभारी स्वरूपात कामकाज सुरू असल्याने अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून नागरिकांनाही त्याचा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page