१५ लाख ८४ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त_
*💫बांदा दि.२९-:* बोलेरो पीकअपमधून गोवा बनावटीच्या दारूची गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याने इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत एकूण १५ लाख ८४ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पीकअपला (जिजे ११ व्हीव्ही ०४६६) तपासणीसाठी थांबविण्यात आले. या टेम्पोच्या मागील हौद्यात नारळाखाली लपवून ठेवलेले विविध ब्रॅण्डचे ५ लाख ५४ हजार ४०० रुपये किमतीचे ५६ खोके आढळून आले. दारू वाहतूक प्रकरणी वापरण्यात आलेला १० लाख रुपयांचा महिंद्रा पिकअप, व इतर ३० हजार ३०० रुपयांचे साहित्य असा एकूण १५ लाख ८४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे, रमेश चंदूरे, शरद साळुंखे, संदीप कदम, शिवशंकर मुपडे आणि विशेष पथकाचे दुय्यम निरीक्षक सचिन यादव, अमर पाटील यांनी केली.
