९४ नागरिकांनी घेतला लाभ
सिंधुदुर्गनगरी ता २८ गावराई ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये आज कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४५ वर्षे वयोगटावरील ९४ नागरिकांनी लसीचा लाभ घेतला. कुडाळ तालुक्यातील गावराई गाव ,कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असून कसाल पासून गावराई गाव लांबच्या अंतरावर असल्याने तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नसल्याने या गावातील नागरिक कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून अद्यापही वंचित राहिले होते. यासाठी गावराई ग्रामपंचायतीच्या विशेष प्रयत्नातून गावराई गावातील ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी कोवि शील्ड लसीचे ८० डोस उपलब्ध करून गावराई येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. आजच्या या लसीकरण मोहिमेत ४५ वर्षावरील वयोगटातील ९४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध व कोविडचे नियम पाळीत लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते . या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर यांच्या हस्ते तर पणदूर सरपंच दादा साहिल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी गावराई सरपंच उदय नारळीकर, उपसरपंच संजय आयरे , ग्रामसेवक एस जी वारंग, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप राऊत, शंकर सावंत, किसन चिंदरकर, आरोग्य सेवक श्री गावडे, यांनी विशेष मेहनत घेतली. तर प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल च्या वैद्यकीय अधिकारी डॉ .दीपा देशपांडे, परिचारिका डी जी अंगचेकर, यांनी लसीकरणाचे काम पार पाडले. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या वयोवृद्ध तसेच ४५ वर्षावरील नागरिकांसाठी गावराई गावामध्ये गावराई ग्रामपंचायतीने लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना दिलासा दिला आहे. याबाबत गावराई ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल च्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
