अडाळी एमआयडीसीतील माती चोरीप्रकरणी तहसीलदार-पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा…

संजू परब यांची मागणी: चौकशी न झाल्यास आंदोलन छेडणार..

⚡सावंतवाडी ता.२९-: अडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या अवैध उत्खनन व चोरीप्रकरणी दोडामार्ग तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केली आहे.

यावेळी बोलताना श्री. परब म्हणाले की, अडाळी एमआयडीसी परिसरात दीड ते दोन महिन्यांपासून अनधिकृतरीत्या मातीचे उत्खनन सुरू असताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी काय करत होती, हा मोठा प्रश्न आहे. पोलीस पाटील, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिक नागरिकांनी आवाज उठवूनही तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे सांगत, या प्रकरणात संबंधित अधिकारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला. “नार्को टेस्ट झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल,” असा दावा परब यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी क्लट्स फर्नांडिस उपस्थित होते.

You cannot copy content of this page