⚡सावंतवाडी ता.०४- : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसेवक रवी जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.
रवी जाधव हे सावंतवाडी शहरासह परिसरातील गावांमध्ये आपत्तीच्या काळात मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. कॉलेज जीवनापासून त्यांनी उपेक्षित व वंचित समाजासाठी काम करत समाजजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे शिक्षण व संघटन यावर भर देत त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात त्यांचा लढा सातत्याने सुरू आहे.
सावंतवाडीतील ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते अनेक वर्षे गरजवंत व निराधारांना मदत करत आहेत. ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आरोग्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणे यामध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक महादेव (भाऊ) आंदुर्लेकर (शिरोडा-मुंबई) यांनाही ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. तसेच सावंतवाडीचे ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘रथ समतेचा’ समूह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सभापती शंकर घार, सरपंच निलेश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, फुले शाहू आंबेडकर विचारमंच अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव महेंद्र मातोंडकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवक रवी जाधव यांना ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ प्रदान…
