या कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळलेला ; उपसभापती अमोल लोके यांचा पं.स.सभेत गंभीर आरोप,देवगड पं.स.मासिक सर्वसाधारण सभा संपन्न..
⚡देवगड ता.०४-:
देवगड भुमिअभिलेख कार्यालयात खातेदारांनी मागणी करूनही जमीनीचा नकाशा मिळत नाही मात्र एजंटानी मागणी केल्यानंतर तात्काळ नकाशा कार्यालयातून दिला जातो.या कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे असा गंभीर आरोप पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी देवगड पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत केला. भुमिअभिलेख कार्यालयाच्या या कारभाराबाबत महसुलमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगीतले.पंचायत समितीचे माजी सदस्य भोगले यांचे उत्पन्न जादा दाखवून घरकूल योजनेतून त्यांना अपात्र केले असा गंभीर आरोप सदाशिव ओगले यांनी केला.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सोमवारी सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील उपस्थित होते.
तालुक्यातील कोणताही आंबा बागायतदार, शेतकरी नुकसानभरपाईपासुन वंचित राहता नये.याबाबतची आकडेवारी मागवून ती सभागृहात सादर करा अशी मागणी सदाशिव ओगले यांनी केली.नुकसानभरपाईबाबत प्रत्यक्ष गावात जावून तलाठी, कृषीसहाय्यक यांनी माहिती घेवून प्रकरणे तयार करावीत अशी सुचनाही ओगले यांनी यावेळी केली.
या सभागृहाचे माजी सदस्य अरविंद भोगले यांना जादा उत्पन्न दाखवून घरकूल योजनेतून अपात्र ठरविले आहे.तसेच हिंदळे येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ग्रामस्थाचेही जादा उत्पन्न दाखवुन घरकुल योजनेतून अपात्र ठरविले आहे.चुकीचा पध्दतीने सर्वे करून लाभापासून वंचित ठेवणाऱ्या सर्वे करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी ओगले यांनी केली.
कोटकामते जि.प.शाळेसमोरील बसविण्यात आलेली खेळणी काढून त्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे.यावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी कुठलाही प्रतिबंध केला नाही.याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ओगले यांनी केली.मुणगे तिठा येथे गतिरोधक नसल्याने अनेक अपघात होतात.गतिरोधक बसविण्यात यावा अशी मागणीही ओगले यांनी केली.देवगड तालुका हा डोंगरी तालुका असल्याने खास बाब म्हणून साकव व साकव दुरूस्तीसाठी जादाचा निधी द्यावा तसेच शाळांची दुरूस्ती व नवीन बांधकामे १५ जुनपर्यंत पुर्ण करावीत अशी मागणी ओगले यांनी केली.वीजेच्या जीर्ण व गंजलेले पोल यांचा सर्वे करून नवीन पोल बसविण्यात यावेत अशी सुचना सभापती गणेश राणे यांनी केली.
तांबळडेग दक्षिणवाडा येथील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नाबाबत १ मे रोजी उपोषणाला बसण्याची नोटीस दिली होती मात्र आपल्या समक्ष पाणीपुरवठा अधिकारी व संबंधित ग्रामसेवक यांनी पाण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन त्या ग्रामस्थांना दिल्यामुळे त्यांनी उपोषण थांबविले होते मात्र अद्यापही त्या ग्रामस्थांना पाण्याची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे त्यांनी आपल्याला उपोषणाला बसणार असल्याचे सांगीतले आहे.आश्वासन देवूनही पाण्याची व्यवस्था न करणाऱ्या संबंधित पाणीपुरवठा अधिकारी व ग्रामसेवकावर कारवाई करावी अशा सुचना उपसभापती अमोल लोके यांनी दिल्या.
देवगड पंचायत समिती फोटो घेणे
