नगरसेविका मोहिनी मडगावकर यांचे लक्ष वेधून देखील अद्याप कुठलीही उपयोजना नाही: भाजपचे कार्यकर्ते अॅड चैतन्य सावंत यांनी केली नाराजी व्यक्त, प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी..
⚡सावंतवाडी, ता. ०४-: शहरातील सबनीसवाडा परिसरात अलीकडील वादळी वाऱ्यामुळे काही झाडे तुटून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या अर्धवट अवस्थेत लोंबकळत आहेत. या धोकादायक स्थितीमुळे कोणत्याही क्षणी फांद्या कोसळून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत स्थानिक नगरसेविका मोहिनी मडगावकर यांचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने भाजपचे कार्यकर्ते अॅड. चैतन्य सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी सांगितले की, परिसरातील काही झाडे पूर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत असून यापूर्वी याबाबत संबंधित नगरसेविकांना कल्पना देण्यात आली होती. मात्र, कामगार उपलब्ध नसल्याचे कारण देत कार्यवाही टाळण्यात आली.
“एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन धोकादायक झाडे व फांद्या हटवाव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने विलंब न लावता योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
