मळगाव ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी…

⚡सावंतवाडी ता.३०-: मळगाव येथील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्य लाईनवरील झाडांची छाटणी, जीर्ण व धोकादायक वीज खांबांचे बदल आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पावसाळ्यापूर्वी मुख्य लाईनवरील झाडी तोडण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन श्री. राक्षे यांनी दिले. तसेच गावात कमी दाबाने सुरू असलेल्या वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. तसेच काही वीज खांब जीर्ण अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या वेळी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु गावकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, रुपेश खडपकर, गणेश खडपकर, देवेन खडपकर, नितिन गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page