⚡बांदा ता.३०-: श्री देवी माऊलीच्या जागृती दिनानिमित्त डेगवे येथे भव्य नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १ मे रोजी रात्री ठीक ९.३० वाजता श्री स्थापेश्वर कला क्रीडा मंडळ, डेगवे यांच्या वतीने ‘गाभारा’ हे ३ अंकी सामाजिक, कौटुंबिक, हृदयस्पर्शी नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे.
डॉ. गणेश हिर्लेकर लिखित आणि एस. व्ही. नाईक दिग्दर्शित या तीन अंकी सामाजिक व कौटुंबिक आशय असलेल्या नाटकाची जिल्ह्यातील रंगभूमी रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नाटकात समाजातील विविध नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत आणि वास्तववादी प्रसंगांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सचिन देसाई व आबाजी सावंत, निर्मिती सहाय्यक म्हणून दादा देसाई व राजेश देसाई, सूत्रधार म्हणून राजन देसाई व मंगेश देसाई कार्यरत आहेत. वेशभूषा सुशील देसाई व विनायक केसरकर यांनी सांभाळली असून प्रकाश योजना व नेपथ्य प्रथमेश रंगमंच (मळगाव) यांनी केले आहे. पार्श्वसंगीत महेंद्र मांजरेकर, छायाचित्रण प्रमोद कळंगुटकर, रंगभूषा उमेश कोंडये तर ध्वनी प्रणाली अविनाश सावंत यांच्या जबाबदारीत आहे.
या कार्यक्रमासाठी देसाई कुटुंबीयांसह अनेक मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या नाटकात मंदार देसाई, किरण देसाई, संदीप देसाई, गणेश (नविन) देसाई, भीमसेन (पप्पू) देसाई, प्रकाश देसाई, विनय देसाई, गजानन देसाई, लाडोबा (दादा) देसाई, प्रतिक देसाई, सुमेध देसाई, डॉ. अमृत देसाई आणि सौ. शोभा मांजरेकर आदी कलाकारांची भूमिका आहे.
हा नाट्यप्रयोग श्री देवी माऊली मंदिर, डेगवे शेजारील रंगमंचावर सादर होणार असून, डेगवे ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या नाटकाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
डेगवे येथे १ मे रोजी ‘गाभारा’ या हृदयस्पर्शी नाटकाचा भव्य प्रयोग…
