नागरिकांच्या संयमामुळे तौक्ते वादळानंतर आठवडाभरात मालवण पूर्वपदावर

नगराध्यक्ष कांदळकर यांची माहिती

*💫मालवण दि.२७-:* तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण शहराला मोठा फटका बसून मोठ्या प्रमाणात झालेल्या पडझडीतून मालवण शहर पूर्वस्थितीत यायला बरेच दिवस लागतील असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त होत होता. परंतु या आपत्ती काळात मालवण शहराच्या प्रत्येक नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रशासनच्या हातात हात घालून मदत केली, सात आठ दिवस पाणी, विज नसताना जो संयम दाखवला त्यामुळेच बहुतांश मालवण शहर एका आठवडाभरात पूर्वपदावर आले आहे, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगत वादळ काळातील मालवण शहरातील जनतेची एकजुट व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. मालवण शहराला १६ मे रोजी तौक्ते वादळाचा जोरदार तड़ाखा बसला. संपूर्ण मालवण शहरात मोठे नुकसान झाले. असा कुठलाच भाग नव्हता की त्या ठिकाणी वादळाने विध्वंस केला नाही. हवामान खात्याने वादळाची जी तिव्रता सांगितली होती त्यापेक्षा जास्त तिव्रतेने हे वादळ मालवण शहरात धड़कले. या वादळाचा जास्त फटका विजवितरण कंपनीला बसला. वीज खांब कोसळले, तारा तुटून गेल्या. दुरुस्तीसाठी जवळपास २०० च्या वर विजवितरणचे कर्मचारी कोल्हापुर, सांगली, बारामती, परभणी, पुणे या ठिकाणावरुन मदतीसाठी मालवण शहरात दाखल झाले. स्थानिक कर्मचारी, दाखल झालेले कर्मचारी व नागरिक यांच्या प्रयत्नातून विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला. या कर्मचाऱ्यांनी मालवणच्या जनतेचे, लोकप्रतिनिधी यांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी म्हटले आहे. कोविडच्या कामात मालवण नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना वादळाचे संकट धडकले. मालवण नगरपरिषदेची यंत्रणा चक्रीवादळ आपत्ती काळात अपुरी पडली. मात्र उपलब्ध सर्व यंत्रणानी सर्वतोपरी काम केले. नागरिकांचे सहकार्य प्रत्येक ठिकाणी मिळत होते. नगरपालिकेतील बरेचसे सफाई कर्मचारी यांच्याही घराचे, झाडांचे वादळात नुकसान झाल्याने काही कर्मचारी कामावर येवू शकले नाहीत. काही सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे दैनंदिन सफाई बाबतीत नागरिकांची ग़ैरसोय झाली. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच वादळाचा तड़ाखा बसल्याने तात्काळ कर्मचारी मिळण्यात अडचणी आल्या. त्यावर उपाय म्हणून कणकवली आणि सावंतवाड़ी नगरपालिकेने आपले काही कर्मचारी, कचरा वाहक ट्रॅक्टर काही दिवसासाठी मालवण शहराला उपलब्ध करुन दिले. उपलब्ध कर्मचारी यांच्या मार्फत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला व केला जात आहे. परंतु या सर्व कामात मालवणच्या जनतेने जे सहकार्या केले, लोकप्रतिनिधी यांनी कुठलेही राजकारण न करता सहकार्याची भूमिका घेतली, प्रशासनाने दिवसरात्र जी मेहनत घेतली त्यामुळेच मालवण शहर लवकर सुस्थितीत यायला मदत झाली, असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे. मोठे नैसर्गिक संकट असल्याने संपूर्ण मालवण शहर पूर्वपदावर येण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. नगरपरिषद लवकरात लवकर सर्वकाही पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. जनतेने आता पर्यंत सय्यम राखून जसे सहकार्य केले त्या प्रमाणे आणखी थोड़े दिवस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील कांदळगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page