आमदार निलेश राणे :तब्बल ७ वर्षांनी झाली कुडाळची आमसभा,पाच तास चाललेल्या आमसभेत १२५ निवेदने..
कुडाळ : लोंकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. प्रशासन कामाला लागले कि लोकप्रतिनिधींचे काम सोपे होते. त्यामुळे या आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी करत राहणार. असे स्पष्ट प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तब्बल सात वर्षांनी कुडाळ तालुक्याची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी हॉल मध्ये झाली. त्यावेळी आमदार निलेश राणे बोलत होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि तब्बल पाच तास चाललेल्या या आमसभेत प्रसंगी आमदार राणे यांनी कठोर धोरण स्वीकारून लोकांच्या प्रश्नांबाबत कोणीही हयगय करू नये असा स्पष्ट इशाराच प्रशासनाला दिला.
येथील महालक्ष्मी सभागृहात झालेल्या या आमसभेच्या सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेला व्यासपीठवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जि प अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, रुहीता तांबे, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती श्री. तेली, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, आरती पाटील, रुपेश कानडे, नागेश आईर, संजय पडते, काका कुडाळकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडून झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. त्यात आमदार निलेश राणे यांच्याच अभिनंदनाचे ठराव जास्त होऊ लागल्याने आमदार निलेश राणे यांनी तात्काळ ते थांबवून आमदार, आमदारांचे कुटुंब यांच्या बद्दलचे ठराव मांडण्यापेक्षा ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे अशांचे अभिनंदनाचे ठराव मांडावेत अशी सूचना केली. आणि तिथेच हि आमसभा नेहमीसारखी नाही याची खूणगाठ उपस्थितांना पटली. त्यांनतर सभापती मिलिंद नाईक यांनी प्रास्ताविकातून आमसभेच्या उद्देश स्पष्ट केला.
गेल्यावेळची आमसभा ९ मार्च २०१९ रोजी झाली होती. त्याचे इतिवृत्त वाचन आणि आलेल्या निवेदनावर झालेली कार्यवाही यांचे वाचन करण्यात आले. त्यावेळी एकूण ५७ निवेदने आली होती. त्यावर चर्चा झाली. एवढ्या वर्षांच्या कालावधीत यातील बरीचशी निवेदने कालबाह्य झाली होती. काही कामे पूर्ण झाली होती. त्याचवेळी कुडाळ नगर पंचायतीच्या बाबत प्रश्न होता. पण उत्तर देण्यासाठी कुडाळ नगर पंचायतचे मुख्याधिकारी सभेला गैरहजर होते. त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी तातडीने त्यांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी आकारीपड जमिनी बाबतचा विषय जिल्हाधिकरी स्तरावरून लवकर मार्गी लावा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. पणदूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नाबाबत आणि समस्यांबाबत देखील चर्चा झाली.
त्यानंतर विभागवार आढाव्याला सुरुवात झाली. महावितरण बाबत बराच काळ चर्चा झाली. कारण लोकांचे प्रश्न होते. समस्या होत्या. खंडित होणारा वीजपुरवठा, स्मार्ट मीटर, भूमिगत वीज वाहिन्या, नवीन सबस्टेशनची उभारणी, ट्रान्सफॉर्मर बसविणे, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे अशा विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. हि चर्चा सुरु असताना बांधकामाचे अभियंता श्री. पिसाळ उपस्थित नव्हते. एका कनिष्ठ अभियंत्याला त्यांनी सभेला पाठविले होते. त्यांच्याकडे माहिती नव्हती. त्यावर आमदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त करून श्री. पिसाळ याना कॉल करून ‘नीट वागायचं; अशा शब्दात त्यांना समज दिली.
महावितरण नंतर राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बाबत सुद्धा लोकांच्या तक्रारी लोकांनी मांडल्या. कुडाळचे बसस्थानक लोकांसाठी गैरसोयीचे आहे, याकडे लोकांनी लक्ष वेधले. त्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा निर्मण करण्याबाबत आमदार महोदयांनी सूचना केल्या. एसटी बसेस स्वच्छ नसतात, स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात, गाडयांना फलक नसतात याकडे देखील सावळाराम अणावकर यांनी लक्ष वेधले. त्यावर अपुरा कर्मचारीवर्ग आहे असे उत्तर एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिले. डीपीडीसी मधून कुडाळ बसस्थानकासाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्याचा वापर करून चांगले बसस्थानक तयार करा असे निर्दश आमदार निलेश राणे यांनी दिले.
महामार्ग विभागाबाबत देखील लोकांच्या खूप तक्रारी होत्या. त्याबाबत देखील अधिकाऱ्यांनी कर्मचारी कमी असल्याची तक्रार केली. भूसंपादनाचे पैसे देण्यासाठी महामार्ग विभाग टाळाटाळ करत असल्याची तक्रार देखील करण्यात आली. झाराप तिठ्यावरचा मिडल कट पुन्हा सुरु करा अशी देखील मागणी लोकांनी केली. दरम्यान कुडाळ मालवण रस्ता एकवर्षात चकाचक करून देतो अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली. त्याचवेळी बीएसएनलचा आढावा घेताना सक्षम अधिकारी न आल्याने आमदार निलेश राणे संतप्त झाले.
वनविभागाच्या कामगिरीवर देखील लोकांनी आणि आमदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. जलसंपदा विभागावर सुद्धा निकृष्ट कामाचे आरोप करण्यात आले. नरडवे प्रकल्पाची दोन गावे कुडाळ तालुक्यातील आहेत. त्या गावातील रस्त्याबाबत लोकांनी तक्रारी केल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक विभागावर देखील चर्चा झाली. तालुका कृषी, पशुसंवर्धन विभागाचा देखील आढावा घेण्यात आला.
त्यांनतर जिल्हा परिषदच्या विभागांचा आढावा घेण्यात आला. निळेली येथे कोंबड्यांची हॅचरी सुरु करण्याबाबत काय झाले असा प्रश्न काका कुडाळकर यांनी विचारला. तसेच गावठी कोंबड्यांसाठी हॅचरी सुरु करावी अशी सूचना केली. वालावलचा पशुवैद्यकीय दवाखाना मोडकळीस आला आहे याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. महिला रुग्णालयासमोरच्या त्रिकोणी जागेत उमेद किचन संकल्पना राबवावी अशी सूचना जि प सदस्य रुपेश कानडे यांनी केली. त्यावर प्रस्ताव सादर करा असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. बालविकास प्रकल्पाचे बजेट वाढविण्याची सूचना देखील आमदार राणे यांनी केली.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यामध्ये असलेल्या गैरसोयी, औषधांची वानवा हे विषय चर्चेत आले. त्यावर आमदार निलेश राणे यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दोन आठवड्यात सर्वे करून त्याचा रिपोर्ट देण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. कुडाळ येथील शवविच्छदेन गृहात कटर उपलब्ध नसल्याचा मुद्दा पत्रकार राजन नाईक यांनी उपस्थित केला. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांशी बोलून निर्णय घेतो असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवनची कामे निधी अभावी बंद असल्याचा मुद्दा चर्चेत आला. काही योजना पूर्ण झाल्या आहेत पण हस्तांतरित झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षण विभागवरच्या चर्चेत तालुक्यातील ९९ शाळा एकशिक्षकीय होणार याकडे काका कुडाळकर यांनी लक्ष वेधले. त्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांसोबतच कंत्राटी डी एड बेरोजगार घ्यावा अशी मागणी श्री. कुडाळकर यांनी केली. याबाबत निर्णय मंत्रिमंडळ घेणार असल्याने आपण पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांच्या बोलतो असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
आयत्या वेळच्या विषयामध्ये रस्ता अडविल्याच्या तक्रारी लोकांनी मांडल्या. तसेच हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएल कडून गॅस पुरवठा करावा अशी मागणी पत्रकार राजन नाईक यांनी केली. दरम्यान नेपाळ येथे स्पोर्ट्स डान्स स्पर्धेसाठी जाणाऱ्या कालेली येथील विद्यार्थिनीला आपण स्वतः मदत करू अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.
आजच्या या आमसभेत एकूण १२५ निवेदने आणि सूचना आल्या होत्या. असे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सांगितले. प्रफुल्ल वालावलकर हे दोन दिवसात सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या ३३ वर्षांच्या सेवेबद्दल त्यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी आमदार निलेश राणे यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यापुढे लोकांच्या हितासाठी जेवढ्या ग्रामसभा घ्याव्या लागतील तेवढ्या आपण घेणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी टाळ्यांच्या गजरात जाहीर केले. उपस्थितांचे आभार बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले. या आमसभेला तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
