आमदार नीलेश राणेंनी हातिवले टोलला विरोध का केला होता…?

वैभव नाईक यांचा सवाल:आठवत नसेल तर त्या जाहिराती माझ्याकडे पाहण्यासाठी केव्हाही उपलब्ध आहेत, ..

कणकवली : आमदार नीलेश राणे यांनी माझ्यावर जे आरोप केले, त्यापेक्षा २०२३ मध्ये जेव्हा राजापूर-हातिवले येथील टोल सुरू झाला होता, त्यावेळी तो टोल बंद होण्यासाठी त्यांनी आंदोलनाची भाषा केली होती. त्यानंतर त्या टोलच्या ठेकेदाराने याच राणेंच्या वाढदिवसासाठी जाहिराती देऊन खर्च केला होता. हे त्यांना आठवत नसेल तर त्या जाहिराती माझ्याकडे पाहण्यासाठी केव्हाही उपलब्ध आहेत, असा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

नाईक यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची आंदोलने ही सर्वसामान्य जनतेसाठी असतात. आंबा, काजूसाठी आंदोलन, एलईडी मासेमारी, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचे आंदोलन आदी आंदोलने आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी केली. मात्र, जनतेसाठी आंदोलने केल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम नीलेश राणे व त्यांचे सहकारी करतात. आमच्यावर कितीही दबाव आणला तरीही जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही आवाज उठवत राहणार. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी जनतेसोबत राहून आम्ही अशी लढाई लढणार आहोत. आमच्या आंदोलनामुळेच त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्ह्याप्रकरणी कायदेशीर कारवाईदेखील झाली आहे. म्हणूनच आम्ही आंदोलने तडीस नेण्याचे काम केले आहे. उलट आमदार नीलेश राणे यांनी नुकत्याच पालिका निवडणुकीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. मात्र, निवडणुकीनंतर त्याच रवींद्र चव्हाण यांच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन हात टेकले होते, हे सर्वांनी पाहिले आहे. आम्ही जनतेसाठी आंदोलन करताना परिणामांची तमा बाळगत नाही. त्यामुळे राणे यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा रवींद्र चव्हाण यांच्यावर तुम्ही जे आरोप केले होते, त्याचे पुढे काय झाले, याचे आत्मपरीक्षण करावे.

You cannot copy content of this page