२.३८ कोटींच्या सुधारित बजेटला मंजुरी..
⚡सिंधुदुर्गनगरी ता २४-:
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सन २०२६- २७ चे मूळ ६० लाख २० हजार ५००रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकात विविध योजनांवर १ कोटी ७८ लाख ३० हजार ३०० रुपयाची वाढीव तरतूद करून २ कोटी ३८ लाख ५० हजार ८०० रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीची पहिली सभा आज सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा महिला व बाल विकास अधिकारी प्रतीक उगारे, समिती सदस्य सुप्रिया मेंस्त्री, अवनी तेली, क्षमा हडकर, आरती पाटील ,हर्षदा वाळके, शोभा गावडे, मिलिंद नाईक आदींसह तालुकास्तरीय बाल प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिला व बाल विकास अधिकारी प्रतीक उगारे यांनी नवनिर्वाचित सभापती तसेच सर्व समिती सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मागील सभेचा इतिवृत्त वाचून सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला महिला बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.
आजच्या सभेत महिला व बाल विकास विभागाचे सन २०२६-२७ चे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या अंदाजपत्रकातील विविध योजनांनिहाय मूळ तरतूद आणि नव्याने करण्यात आलेली तरतूद याबाबत समिती सचिव प्रतीक उगारे यांनी सभागृहाला माहिती दिली. यामध्ये गट -अ मधील प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांमध्ये ,मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे या योजनेसाठी मूळ ९ लाख ५० हजार तरतुदीत २० लाख ५० हजार ची वाढ करत ३० लाख तरतूद करण्यात आली. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे यासाठी मूळ ४ लाख ५० हजार तरतुदीत ३० लाख ५० हजार ची वाढ करत ३५ लाख तरतूद, बालवाडी ,अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देणे या योजनेसाठी मूळ ३ लाख तरतुदीत आणखी ३ लाख तरतूद वाढवून ६ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. पंचायत महिला शक्ती अभियानातर्गत पंचायतराज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधीना प्रशिक्षण व महिला मिळावे व मार्गदर्शन केंद्र, यासाठी मूळ ३ लाख तरतुदीत ३ लाख ७५ हजार ची वाढ करत ६ लाख ७५ हजार तरतूद केली. बालवाडी व अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण यासाठी मूळ ४९ हजार ९०० तरतुदीत २ लाख ५० हजार १०० रुपयाची वाढ करत ३ लाख तरतूद केली.विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार योजनेसाठी मूळ ३ लाख तरतुदीत आणखी ४ लाख वाढवून ७ लाख तरतूद अशाप्रकारे गट -अ मधील प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांसाठी मूळ ३० लाख १०० रुपयाच्या तरतुदीत आणखी ८९ लाख १५ हजार १५० रुपयाची वाढ करून १ कोटी १९ लाख १५ हजार २५० एवढी वाढीव तरतूद करण्यात आली. तर गट -ब च्या वस्तू खरेदीच्या योजनांमध्ये नव्याने ३ लाख ३९ हजार रुपयाची तरतूद करण्यात आली. महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेसाठी मूळ ८ लाख तरतुदीत ६७ लाख ७६ हजार २५० रुपयाची वाढ करून ७५लाख ७६ हजार २५०रुपयाची तरतूद केली. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरवणे या योजनेत मूळ ५ लाख ५० हजार तरतूदित २ लाख ५० हजार ची वाढीव तरतूद करून ८ लाख तरतूद करण्यात आली. प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत मूळ ४ लाख ५० हजार च्या तरतुदीत १५ लाख ५० हजार रुपयाची वाढीव तरतूद करून २० लाख तरतूद करण्यात आली. गट -ब च्या वस्तू खरेदी योजनासाठी मूळ ३० लाख १०० रुपये तरतुदीत ८९ लाख १५ हजार १५० ची वाढ करत १ कोटी १९ लाख १५ हजार २५० एवढी तरतूद केली आहे. अशाप्रकारे महिला व बाल विकास विभागाच्या गट -अ आणि गट-ब योजनांसाठी ६० लाख २०० रुपयांच्या मूळ तरतुदीत १ कोटी ७८ लाख ३० हजार ३०० रुपयांची वाढ करून एकूण २ कोटी ३८ लाख ३० हजार ५०० रुपये तरतूद करण्यात आली आहे. या सुधारित अंदाजपत्रकास आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
महिला व बाल विकास विभागाच्या सर्व योजनांचा लाभ महिला व बालकांना मिळावा या दृष्टीने सर्व योजना प्रभावितपणे राबविण्यात याव्यात योजना राबवताना सर्व समिती सदस्यांना विश्वासात घ्यावे अशा सूचना यावेळी सभापती अनुराधा नारकर यांनी केल्या
