⚡बांदा ता.२३-: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले असून नुकतीच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज बांदा ग्रामस्थांनी प्रमोद कामत यांची भेट घेऊन पूरनियंत्रणासंदर्भात विविध मागण्या मांडल्या.
बांदा शहर हे बुडीत व पूरप्रवण क्षेत्र म्हणून नोंदविले गेले असून दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पूरकाळात तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली फायबर बोट वजनाने हलकी असल्याने पूराच्या तीव्र प्रवाहात तिचा प्रभावी वापर करणे कठीण जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीसाठी मजबूत लाकडी बोट उपलब्ध करून द्यावी, तसेच विद्यमान फायबर बोटीला आउटबोर्ड मशीन बसवून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीची तात्काळ दखल घेत प्रमोद कामत यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन पावसाळ्यापूर्वी लाकडी बोटीसह आवश्यक आपत्कालीन साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, पाटेश्वर युवक मंडळाचे राज हरमलकर, साई मठाचे राकेश केसरकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश नाटेकर, दिलीप बांदेकर, शुभम कवठणकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
ओरोस येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना निवेदन देताना बांदा ग्रामस्थ.
पूरग्रस्त बांद्यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करा; ग्रामस्थांची जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे मागणी…
