Headlines

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान..

⚡सिंधुदुर्गनगरी ता २३-:
संस्थात्मक प्रसूती उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचा आरोग्य समितीच्या सभेत सन्मान करण्यात आला, तर दुर्धर आजारग्रस्तांना आर्थिक मदत योजनेतील नव्या अटींचा प्रस्ताव सदस्यांनी फेटाळून लावत जुने निकष कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, समिती सदस्य संतोष पारकर ,सावी लोके, अवनी तेली, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, सुनील पारकर, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

संस्थात्मक प्रसूती उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी आशिष मोहोड यांनी देवगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल येथे सर्वाधिक १३ प्रसुत्या करत प्रथम क्रमांक मिळवून दिला. द्वितीय क्रमांक मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राने, तर तृतीय क्रमांक खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकाविला. या सर्व संस्थांचा सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र, भेटवस्तू आणि तुळशीचे रोपटे देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान, दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेसाठी नव्याने अटी लागू करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सभेसमोर मांडला होता. मात्र या अटी लागू झाल्यास प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता व्यक्त करत सदस्यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे या योजनेत पूर्वीप्रमाणेच निकष कायम राहणार आहेत.
तसेच आरोग्य संस्थांची वीज बिले पूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत (NHM) भरण्यात येत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा निधी मिळत नसल्याने संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्याबाबत ठराव सादर करावा, अशा सूचना सभापती राऊळ यांनी दिल्या.

आरोग्य केंद्र इमरतींचा सर्वे करावा

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि येथील निवासी इमारतींचा तत्काळ सर्व्हे करून त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करावा, अशा सूचना सभापती प्रितेश राऊळ यांनी दिल्या.

आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी तत्काळ सुरू करा
प्राथमिक आरोग्य केंद्रांतील दूरध्वनी सेवा कार्यरत नसल्याने संपर्क साधताना अडचणी येत असल्याचा मुद्दा सदस्यांनी सभेत उपस्थित केला. यावेळी दूरध्वनी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र सभापतींनी प्रत्यक्ष पडताळणीसाठी कोणत्याही केंद्राला फोन लावण्यास सांगितले असता एकाही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला संपर्क साधता आला नाही. यावर संताप व्यक्त करत सभापती राऊळ यांनी सर्व आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

हत्तीरोग, माकडताप रुग्णांत वाढ

जिल्हा हिवताप विभागामार्फत आजच्या सभेत दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सन २०२५ मध्ये एकूण १८ हत्तीरोग रुग्ण आढळले होते तर सन २०२६ मध्ये आतापर्यंत ११५ रुग्ण आढळले आहे. त्यामध्ये हत्ती पायाचे ५८ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे तर सन २०२५ मध्ये जिल्ह्यात माकड तापाचे ४ रुग्ण आढळले होते यावर्षी २०२६ मध्ये आतापर्यंत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात ५ रुग्ण आढळले असल्याची माहिती आजच्या सभेत देण्यात आली.तर या व्यतिरिक्त हिवतापाचे २५ रुग्ण,डेंग्यूचा १रुग्ण आढळला असल्याचे सांगण्यात आले . याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना सभापती प्रितेश राऊळ यांनी यावेळी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

You cannot copy content of this page