जि.प. आरोग्य विभागाच्या १.४८ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास समितीची मंजुरी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता २३-:
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत स्व उत्पन्नाच्या सन २०२६-२७ चे सुधारित १कोटी ४८ लाख ८४ हजार ६०० रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत वित्त समितीच्या मान्यतेसाठी शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, समिती सदस्य सावी लोके, अनवी तेली ,श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, संतोष पारकर ,सुनील पारकर, आदी सदस्यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची पहिली सभा तब्बल दीड तास उशीराने सुरू झाली. दुपारी १२ वाजता आयोजित केलेली सभा दुपारी १.३० वाजता सुरू झाल्याने उपस्थित अधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांना सभेची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर उशिराने सुरू झालेल्या या सभेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सन २०२६- २७ चे सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देणे, हा प्रमुख विषय ठेवण्यात आला होता. मात्र ही सभा उशिराने सुरू झाल्याने विविध योजनांसह साथरोगांचा आढावा. तसेच सुधारित अंदाजपत्रकावर अधिकची चर्चा झालेली नाही. काही ठराविक योजनांबाबत चर्चा करून आरोग्य विभागाने समितीसमोर ठेवलेल्या सुधारित अंदाजपत्रकास वित्त समितीकडे शिफारस करण्यास मंजुरी दिली.

आजच्या समिती समोर मंजुरीस ठेवण्यात आलेल्या सुधारित अंदाजपत्रकात काही योजनांवर वाढीव निधीची तरतूद करत मूळ ९९ लाख ८६ हजार ४०० रूपये खर्चाचे अंदाजपत्रकात ४८ लाख ९८हजार २०० रुपयाची वाढ करत १ कोटी ४८ लाख ८४ हजार ६०० रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास वित्त समितीच्या मान्यते साठी शिफारस करण्यास आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या सुधारित आराखड्यात, कुटुंब कल्याण कार्यक्रम साठी लागणाऱ्या इंधनासाठी १०लाख ६० हजार रुपये वाढ, प्राथमिक आरोग्य केंद्र विद्युत व दुरुस्तीची बिले यासाठी २६लाख ५० हजार रुपयाची वाढीव तरतूद, कॅन्सर हृदयरोग व किडनी अशा दुर्धर रोगाने पीडित रुग्णांना आर्थिक मदत यासाठी मूळ तरतुदीत ५ लाख रुपयांची वाढ, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर संगणक खरेदी व दुरुस्ती करणे यासाठी १ लाख ५८ हजार रुपये वाढ, अंशकालीन स्त्री परिचर यांना रुपये १००० प्रमाणे भाऊबीज भेट देणे यासाठी मूळ तरतुदीत १ लाख २५ हजार रुपये वाढ ,सिंधू आरोग्यमेळा ही नावीन्यपूर्ण योजना राबवणे यासाठी मूळ तरतुदीत २ लाख ५० हजार ची वाढीव तरतूद ,अशाप्रकारे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सन २०२६-२७च्या सुधारित अंदाजपत्रकात ४८ लाख ९८ हजार २०० रुपयाची वाढीव तरतूद करून १कोटी ४२ लाख ८४ हजार ६०० रुपयाच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page