तीन वर्षांचा विज्ञान प्रदर्शन खर्च थकबाकी; शिक्षण समितीत तीव्र नाराजी…

⚡ओरोस ता २३-: चार वर्षे प्रशासकीय राजवट असताना शिक्षण विभागाने जिल्ह्यात झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचा खर्च केला नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. त्यामुळे २०२६-२७ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात तब्बल १५ लाख रुपयांचे दायित्व राहिले आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षाचा खर्च प्राथमिक शिक्षण विभागाने न केल्याने सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले. दरम्यान, शिक्षण विभागाच्या दोन कोटी २९ लाख ८० हजार ५०० रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला यावेळी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद हाजी अफरुद्दीन, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी डी एस पाटील, सदस्य प्राची इस्वलकर, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, नितीन राऊळ, अपर्णा सातोसकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिक्षण विभागाचे २०२६-२७ चे सुधारित बजेट मांडण्यात आले. मूळ बजेट एक कोटी ४६ लाख ४० हजार ६०० रुपयांचे होते. त्यात ८३ लाख ३९ हजार ९६० रुपयांची वाढ करीत एकूण दोन कोटी २९ लाख ८० हजार ५०० रुपये खर्चाचे बजेट सभागृहात मांडण्यात आले. त्याला सभागृहाने मंजुरी दिली. यामध्ये ३५ लाख रुपयांच्या दायित्वाचा समावेश आहे. यातील विज्ञान प्रदर्शनाचे १५ लाख रुपये दायित्व असल्याने सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय राजवट असताना तीन वर्षाचा झालेला खर्च प्रशासन देवू शकले नाही. जिल्हा परिषद स्वनिधीतून हे पैसे द्यायचे असताना ते का दिले गेले नाहीत ? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. याबाबत चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे सभाध्यक्ष राऊळ यांनी ही प्रशासनाची १०० टक्के चूक आहे असे सांगत चौकशी करण्याचे आदेश दिले.

एज्युकेशन एक्स्पो होणार
प्रशासकीय राजवटीत ठप्प झालेला परंतु जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या दुष्टीने महत्त्वाचा असणारा एज्युकेशन एक्स्पो यावर्षी करण्यात यावा, त्यासाठी आर्थिक नियोजन करावे, अशी मागणी यज्ञ साळगावकर यांनी केली. त्यानंतर सभाध्यक्ष राऊळ यांनी एज्युकेशन एक्स्पोचे महत्व विषद करीत यासाठी ४० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येईल, असे सांगितले. याला पूर्ण सभागृहाने मान्यता दिली. त्यामुळे यावर्षी एज्युकेशन एक्स्पो होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट
पोषण शक्ती निर्माण प्रधानमंत्री उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात विजेते ठरलेल्या शाळांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सभापती प्रितेश राऊळ यांच्याहस्ते त्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि मुले यांनी हा सन्मान स्वीकारला. यामध्ये कणकवली तालुक्यातील साळीस्ते नंबर १ शाळेने प्रथम क्रमांक, वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंढराचीवाडी पेंडूर या शाळेने तृतीय क्रमांक, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे शाळेने तृतीय क्रमांक, कुडाळ तालुक्यातील आंबडपाल शाळेने उत्तेजनार्थ प्रथम, मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा शाळेने उत्तेजनार्थ द्वितीय आणि देवगड तालुक्यातील पुरळ शाळेने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंढराचीवाडी पेंडूर शाळेच्या मुलानी परसबाग भाजी यावर सुंदर गीत सादर करीत भाज्यांचे महत्त्व विषद केले.

चौकट
शासनाने शाळेचे वीज बिल ग्रामपंचायतीने वित्त आयोग निधीतून भरावे, असे नव्याने आदेश काढले आहेत. परंतु वित्त आयोगाचे आराखडे डिसेंबर 2025 मध्ये तयार करण्यात आले आहेत. तर शासनाचे आदेश 2026 मध्ये आले आहेत. त्यामुळे वित्त आयोग निधीतून शाळांची वीज बिले भरता येणार नाहीत. तसेच एका एका गावामध्ये चार ते पाच शाळा आहेत. या शाळांची वीज बिले भरण्याएवढ्या ग्रामपंचायती सक्षम नाहीत. त्यामुळे यासाठी जिल्हा स्तरावरून नियोजन करण्यात यावे, अशी मागणी प्राची इस्वलकर यांनी केली. यावर सभाध्यक्ष राऊळ यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांचा वीज बिल भरणा करण्यासाठी येणारा खर्च, याबाबतचा आराखडा तयार करावा. तो जिल्हा नियोजन कडे सादर करण्यात येईल. तसेच शाळा जवळ सोलर सिस्टिम बसवण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा असे आदेश दिले.

चौकट
जिल्ह्यातील ज्या 260 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्या सीसीटीव्हीची कॉलिटी आणि क्वांटिटी याची तपासणी करण्यात यावी. ती योग्य असल्याची खातर जमा झाल्याशिवाय याबाबतची बिले अदा करण्यात येऊ नयेत, असे आदेश यावेळी सभाध्यक्ष राऊळ यांनी दिले. त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी स्वतः शाळांमध्ये जाऊन खात्री करावी. तसेच जिल्हास्तरावर याकरिता स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल, असेही यावेळी राऊळ यांनी सांगितले. याबाबत यज्ञा साळगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:१) पोषण शक्ती निर्माण प्रधानमंत्री उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कणकवली तालुक्यातील साळीस्ते नंबर १ शाळेला सन्मानित करताना शिक्षण सभापती प्रितेश राऊळ सोबत प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद हाजी अफरुद्दीन, जिल्हा परिषद सदस्य प्राची इस्वलकर
२) द्वितीय क्रमांक मिळविलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंढराचीवाडी पेंडूर सन्मानित करताना शिक्षण सभापती प्रितेश राऊळ सोबत प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद हाजी अफरुद्दीन, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर आणि मुले

You cannot copy content of this page