लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबातील ४ जण जखमी.
सावंतवाडी : येथील मळगाव घाटात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कुटुंबाची कार थेट दरीत कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सालईवाडा येथील कुटुंब एका लग्न समारंभासाठी गेले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास मळगाव घाटातील डिके टुरिझम हॉलच्या परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने ही कार थेट खोल दरीत कोसळली. दैव बलवत्तर म्हणून जीवीत हानी झाली नाही. मात्र, यात गाडीतील प्रवाशांना गंभीर इजा झाली. अपघात घडल्यानंतर स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू असतानाच झाडावरील मधमाशांचे पोळ चाळवले. मधमाशांनी हल्ला चढवलेला असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या युवकांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरूच ठेवले. या भीषण अपघातानंतर रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, सचिन हरमलकर आदींनी युद्धपातळीवर मदत कार्य केले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
