माजगावमध्ये सरपंचपदासाठी चार महिला उमेदवार रिंगणात..
⚡सावंतवाडी ता.१३-:
तालुक्यात २९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून 15 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून माजगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी एकूण चार जणांनी अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी काहीशी चुरस होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अहवालानुसार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून, काही ठिकाणी सरपंच पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वाधिक चुरस असून येथे चार महिला उमेदवारांनी आपले नशिब आजमावण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये श्रध्दा सावंत, रंजना कानसे, सपना गावडे आणि जयश्री सावंत यांचा समावेश आहे. नाणोस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी साक्षी शेट्ये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सरपंच पदासोबतच सदस्य पदांसाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून, नाणोस प्रभाग २ मधून विष्णू कांबळी व रविंद्र जोशी यांनी, तर माजगाव प्रभाग २ मधून अनघा धुरी व शिल्पा साळगावकर यांनी अर्ज भरले आहेत. तसेच माजगाव प्रभाग ४ साठी राजवी पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
किनळे प्रभाग ३ मधून अश्वीन कोरगावकर, कारिवडे प्रभाग २ मधून नेहा परब आणि कास प्रभाग १ मधून विश्वनाथ पंडीत यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. शेर्ले प्रभाग १ मध्ये जिज्ञासा तारी, निगुडे प्रभाग १ मध्ये समिश्रा गावडे, रोणापाल प्रभाग २ मध्ये प्रिया गाड आणि कवठणी प्रभाग ३ मध्ये पांडुरंग हळदणकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विलवडे प्रभाग १ मधून भावना सावंत आणि गायत्री दळवी यांनी, तर कुडतरकरटेंब प्रभाग ३ मधून महिमा दळवी आणि सुश्मिता म्हाडगुत यांनी आपले नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत.
