⚡सावंतवाडी, ता.१२-:
घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने महिलां व मुलींसाठी विशेष झुंबा प्रशिक्षण उपक्रम मागील महिनाभर यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कोणताही मोबदला न घेता आयोजित केलेल्या या उपक्रमाला सावंतवाडी तसेच परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या आरोग्यवृद्धीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या उपक्रमाचा समारोप काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. यावेळी सहभागी महिलांनी झुंबा नृत्याचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. संपूर्ण उपक्रमादरम्यान झुंबा प्रशिक्षक पंकज टिळवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा लाभ झाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी, खजिनदार स्वप्नाली कारेकर, सल्लागार शारदा गुरव यांसह अन्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सहभागी महिलांचे कौतुक केले.
प्रशिक्षण घेतलेल्या महिलांपैकी प्रार्थना राणे, मिताली राऊळ, सविता गव्हाणे, विनिता बागायतकर, संजीवनी सौंदेकर आदींनी आपले अनुभव मांडताना अशा उपक्रमांमुळे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले. भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिताली राऊळ यांनी मानले. यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षक पंकज टिळवे यांचा सत्कार करण्यात आला.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. माधवी कशाळीकर यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही महिलांसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस संस्थापिका मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला.
