शिरवल येथे श्री विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा…

१६ ते २३ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

⚡कणकवली ता.११-: वै. गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज, पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस) यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबवाडी, शिरवल येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ ते गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते होणार असून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातील वारकरी तसेच शिरवल गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सप्ताहात दररोज पहाटे ५ वाजता काकड आरती, त्यानंतर श्रींची महापूजा, सकाळी ८ ते १२ या वेळेत ग्रंथवाचन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ नाट अभंग भजन, सायंकाळी ६.३० वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता कीर्तन आणि रात्री १० नंतर महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.

या सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार असून १६ एप्रिल रोजी ह.भ.प. ओंकार महाराज सावंत (शिरवल), १७ एप्रिल रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस), १८ एप्रिल रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माने (हेरवाड-कोल्हापूर), १९ एप्रिल रोजी ह.भ.प. सचिन महाराज आळतेकर (कोल्हापूर), २० एप्रिल रोजी ह.भ.प. गणेश महाराज कुळये (मुंबई), २१ एप्रिल रोजी ह.भ.प. भूषण महाराज वरखले (आळंदी) आणि २२ एप्रिल रोजी ह.भ.प. वेदांताचार्य उदय महाराज शास्त्री (मठाधिपती, स्वामी शिवानंद आश्रम, कर्नाटक) यांची कीर्तनसेवा होणार आहे. तसेच २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ एप्रिल रोजी वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहाटे ५.३० ते ६.३० काकड आरती, ६.३० ते ८.३० अभिषेक व महापूजा, सकाळी ९ ते १२ ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ ग्रंथदिंडी (शिरवल श्री रवळनाथ मंदिरापर्यंत), सायंकाळी ६.३० ते ७.३० दीपोत्सव आणि रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनसेवा होणार आहे. तसेच २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. राहुल महाराज परब (आंब्रड) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

या सप्ताहात कृष्णा मेस्त्री, गजानन राणे, चकोर सावंत, कृष्णा उर्फ दर्शन गवंडळकर, संजय सावंत आणि सचिन लाड हे मृदंगवादक साथसंगत करणार आहेत. तसेच काकड आरतीसाठी ह.भ.प. तारी महाराज, ह.भ.प. प्रकाश सावंत (भिरवंडे), ह.भ.प. सामंत (फोंडाघाट), सूर्यकांत सावंत, आबा भिसे, सदा राणे, सिद्धेश सावंत आणि कृष्णा सावंत (घोटगे) यांचे सहकार्य लाभणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्त, वारकरी आणि ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन निमंत्रक ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज तसेच श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्ट, शिरवलच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page