⚡मालवण ता.०९-:
मालवण समोरील समुद्रात बेकायदेशीरपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा व देवगड येथील नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली आहे. या दोन्ही नौका तसेच त्यावरील साहित्य मत्स्य विभागाने जप्त केले आहे.
बुधवारी ८ एप्रिल रोजी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्ती पथक मालवण समोर समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ (नों. क्र. आयएनडी एम एच – ५ एमएम – ६८५) व अक्राजे (नों. क्र.- आयएनडी- जीए-१ एमएम ३९६२) या दोन नौका महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अनधिकृतरित्या एलईडी लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ३५-४० खलाशी आहेत. या नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील एलईडी लाईट सामग्री जप्त करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
वादळी वारे आणि उंचच उंच लाटांच्या थरारक पार्श्वभूमीवर मालवण समुद्रात संयुक्त गस्ती दरम्यान अंमलबजावणी अधिकारी अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण यांच्या पथकाने सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सागर कुवेसकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.
मागील आठवड्यात गोवा आणि रत्नागिरी येथील एलईडी नौकांवर कारवाई करण्यात आली होती. तर आता मत्स्य विभागाने मालवण समुद्रात संयुक्त गस्तीदरम्यान एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त केल्या आहेत. सध्याच्या हंगामात ही एलईडी मासेमारीविरुद्धची दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे, अशी माहिती मत्स्य विभागाने दिली आहे.
