महादेव शिंगाडे:अनुभव शिक्षा केंद्र आयोजित पर्यावरण परिषदचे मालवणात उद्घाटन..
⚡मालवण ता.०३-: अनुभव शिक्षा केंद्र, महाराष्ट्र आयोजित तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचे उदघाटन बॅ. नाथ पै सेवांगण येथे मालवण वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांच्या हस्ते झाले. सध्याच्या हवामान बदलांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, कोकणातील पर्यावरणीय समस्या समजून घेत पर्यावरणमित्र ही संकल्पना युवकांच्या मनात दृढ व्हावी, असे मत यावेळी महादेव शिंगाडे यांनी मांडले.
यावेळी मालवणचे नवनियुक्त वनरक्षक राहूल राजगुडे यांनी उत्तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,कोकण अशा विभागातून आलेल्या साथीचे सिंधूदुर्गनगरीत स्वागत करत सदिच्छा व्यक्त केल्या. UNDP प्रकल्प जिल्हा समन्वयक रोहित सावंत यांनी सागरी जैवविविधता, निसर्गातील परिसंस्था वाचवणे पर्यावरणासाठी किती आवश्यक आहेत हे विशद करत पर्यावरणपुरक जीवनशैलीच पुढच्या पिढीसाठी आदर्श असेल, असे मनोगतातून सांगितले. यावेळी इकोमेट संस्थेच्या सदस्य दूर्गा सावंत यांनी कोकणातील उपजिविका, व्यवसाय, पर्यटन हे अधिक पर्यावरणपूरक शाश्वत बनविणे हेच पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे असलेचे अधोरेखित केले. बार्टी समतादूत संग्राम कासले यांनी परीषदेस सदिच्छा व्यक्त केल्या.
या तीन दिवसीय पर्यावरण परीषदेत स्थानिक पर्यावरणीय समस्यावंर चर्चासत्र, शाश्वत शेती प्रकल्प भेटी, कांदळवन भेट तसेच स्थानिक मच्छीमारांचे पर्यावरणीय प्रश्न समजून घेणे, वाढत्या विकासाच्या व्याख्येत पारंपारिक शाश्वत जीवनशैलीचे भवितव्य व युवक अशा विविध विषयांवर भेटी व मार्गदर्शन होणार असल्याचे अनुभव शिक्षा केंद्र विभागीय समन्वयक दिपक देवरे यांनी सांगत स्थानिक पातळीवर पर्यावरणीय समस्याना युवकांनी ओळखुन त्यावर कृति कार्यक्रम ठरविणे हा अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने आयोजित पर्यावरण परिषदेचा उद्देश असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जितेंद्र राठोड यांनी केले.आभारप्रदर्शन अशोक वरूटे यांनी केले. यावेळी युथ बीट्स फाॅर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोझा, इकोमेट संस्थेच्या स्वाती पारकर, अनुभव साथी महादेव कोटे, सहदेव पाटकर, सरस्वती शिंदे, तसेच धूळे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, लातुर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवती उपस्थित होते.
