सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनची राज्य सरकारकडे मागणी; नाना पटोले यांना दिले निवेदन
*💫मालवण दि.२४-:* सध्या लॉकडाऊन काळात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असून यामुळे व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे सलून व ब्युटीपार्लर व्यावसायिकांना आर्थिक मदत घ्यावी तसेच या व्यवसायास अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सलून अँड ब्युटीपार्लर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा या संस्थेतर्फे राज्यसरकारकडे करण्यात आली असून याबाबतचे निवेदन मालवण दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना सादर करून त्यांचे लक्ष वेधण्यात आले. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मालवणच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची सलून अँड ब्युटीपार्लर असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकऱ्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. सायली मांजरेकर, मालवण तालुकाध्यक्षा नीलम शिंदे, तालुका कार्याध्यक्षा हर्षलता गावकर, तालुका खजिनदार योगिता भोजने आदी उपस्थित होत्या. लॉकडाऊनमुळे सलून व ब्युटीपार्लर बंद असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. सरकारने याची दखल घेऊन व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी. राज्य सरकारने सलून व ब्युटीपार्लर व्यवसायाला अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता देऊन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. सरकारला तसेच कोरोनाच्या संकटात सहकार्य व मदत करण्यास व्यावसायिक तयार आहेत. स्वतःची तसेच ग्राहकांची काळजी घेऊन सलून व पार्लर व्यवसाय सुरू करण्यात येईल. व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांना सरकारकडून मोफत लसीकरण करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या असून याबाबत सरकारने लक्ष द्यावे, असे सलून अँड ब्युटीपार्लर असोसिएशनतर्फे जिल्हाध्यक्षा सौ. सायली मांजरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर आम. पटोले यांनी ३१ मे पर्यंत लॉकडाऊन असून जून मध्ये लॉकडाऊन उठले किंवा सुरू राहिले तरी सलून व पार्लर व्यावसाय सुरू करण्याचा सरकार प्रयत्न करेल, व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. दरम्यान मालवण दौऱ्यावर आलेले मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनाही निवेदन सादर करत पार्लर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
