बांद्यात पावसाळापूर्व वीज व्यवस्थेची कामे तातडीने करण्याची मागणी…

⚡बांदा ता.०२-: बांदा शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे रस्त्याकडील जीर्ण झाडे व फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडण्याच्या घटना घडतात. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन नागरिक, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर भाजपाचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देऊन पावसाळापूर्व कामांचे नियोजन तातडीने करण्याची मागणी केली.
कल्याणकर यांनी महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. या निवेदनात पावसाळ्यापूर्वीच शहरातील विद्युत वाहिन्यांवर झुकलेली झाडे व धोकादायक फांद्या छाटण्याची मोहीम राबवावी, तसेच या कामासाठी विशेष क्रेन व पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहरातील अनेक ठिकाणी जीर्ण झालेले वीजखांब, सैल झालेले तारा व लोंबकळणाऱ्या केबल्स यांची तातडीने दुरुस्ती करावी. काही भागात ट्रान्सफॉर्मर परिसरात वाढलेले गवत व झुडपे साफ करून सुरक्षितता उपाययोजना कराव्यात. वादळी वाऱ्याच्या वेळी अपघात टाळण्यासाठी ढिले कनेक्शन, जंक्शन बॉक्स आणि इन्सुलेटर यांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित दुरुस्ती करता यावी यासाठी आवश्यक साहित्य व दुरुस्ती पथके सज्ज ठेवावीत, तसेच शहरातील प्रमुख भागातील ट्रान्सफॉर्मरची तपासणी करून त्यांची क्षमता व स्थिती पाहावी. वारंवार बिघाड होणाऱ्या ठिकाणी तांत्रिक उपाययोजना करून नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, उप-कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी या मागणीची दखल घेत पुढील काळात दर मंगळवारी नियोजनपूर्वक कामे राबवून बांदा शहरातील झाडेझुडपांची छाटणी करण्यासाठी क्रेन व कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाईल. तसेच पावसाळ्यापूर्व आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page