जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा सवाल :जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांचे वेधले लक्ष..
⚡कुडाळ ता.०२-: शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असताना संस्था आणि बँकांकडून त्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढल्या जात आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. याकडे नेरुरचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक याना त्यांनी पत्र देऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
रुपेश पावसकर यांनी पात्रात म्हटले आहे कि, सध्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली असून त्याबाबत प्रत्येक संस्था/बँक यांचेकडून शेती कर्जाविषयी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांना वित्तीय संस्था या शेती कर्ज व छोट्या शेती कर्जासाठी खावटी कर्ज देत असताना खावटी कर्ज हे सुद्धा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था देत असतात. त्यामुळे खावटी कर्ज ही शेती कर्जात गणले जाते.
असे असता कुडाळ तालुक्यातील चेंदवण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने तेथील शेतकरी कर्जदारांना कर्ज वसुलीच्या नोटीचा बजावल्या असून कायदा कलम १०१ खाली कारवाई करण्याचे कळवून शेतकऱ्यांना वेठीस धरलेले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. तरी सदर प्रकरणी आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेटीस धरून त्रास न देणेबाबत सूचना द्यावी अशी विनंती जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांना केली आहे.
