नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून तात्काळ उपाययोजनांची ग्वाही..
⚡कणकवली ता.२४-: कलमठ नाडकर्णी नगरला कणकवली नगरपंचायतीचे पाणी मिळणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या सहकार्याने आणि कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होणार आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील नाडकर्णी नगरला गेले काही दिवस अस्वच्छ पाणी पुरवठा होत होता. याशिवाय पाण्याच्या वेळा देखील अनियमित होत्या. यामुळे नाडकर्णी नगरमधील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच नाडकर्णी नगरमधील विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांची भेट घेतली.
याबाबत कलमठ ग्रामपंचायत कार्यालय येथे सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याशी पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती कणकवली नगरपंचायतीचे स्वच्छ पाणी कलमठ नाडकर्णी नगरला पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाडकर्णी नगरला यापुढे स्वच्छ पाणी नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा होणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, आशियेचे सरपंच महेश गुरव, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, महेश लाड, अनुप वारंग, निखिल पवार, श्रेयस चिंदरकर, नितीन पटेल, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
