सावंतवाडी नगरपरिषदेत कामगार हिताचा मोठा निर्णय…

२२ वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी: प्रभारी नगराध्यक्षांनी मानले आभार..

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या सभेत मंगळवारी अत्यंत महत्त्वाचा आणि कामगारहिताचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. लाड पांगे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या २२ वारसांना नगर परिषदेच्या आस्थापनेवर अनुकंपा तत्वावर नेमणूक देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात सभागृहात ठेवण्यात आलेल्या ठरावाला सर्वांनी एकमताने मंजुरी दिल्याने सभेचे अध्यक्ष असलेल्या नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी सर्वांचे अभिनंदन करत सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय आहे असे निरवडेकर यांनी सांगितले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आज मासिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये लाड पांगे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वर्षांना नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सफाई कामगार म्हणून नेमणूक देण्याबाबत ठराव नगरसेवक आनंद नेवगी यांनी वाचला. या ठरावावर कोणीही विरोध न करता एकमताने मंजुरी दिली. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर होते. सभागृहाने एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. “हा निर्णय कामगारांच्या कुटुंबांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून त्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करणारा आहे. नगर परिषदेने सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय आहे,” असे निरवडेकर यांनी सांगितले.या निर्णयामुळे २२ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना थेट लाभ होणार आहे. संबंधित वारसांना नोकरीत सामावून घेतल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल. अनुकंपा तत्वावर दिल्या जाणाऱ्या नियुक्त्या या केवळ नोकरीपुरत्याच मर्यादित नसून त्या कुटुंबाच्या स्थैर्याचा आधार ठरतात, अशी भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.दरम्यान, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी चर्चेदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. एका कर्मचाऱ्याचे वय ८ एप्रिल रोजी पूर्ण होत असल्याने त्यालाही या निर्णयाचा लाभ मिळणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर नगराध्यक्ष निरवडेकर यांनी स्पष्ट केले की, संबंधित कर्मचाऱ्यालाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्याही पात्र वारसाला वंचित ठेवले जाणार नाही.सभेत झालेल्या या निर्णयामुळे नगर परिषद प्रशासनाची कामगारांप्रती असलेली सकारात्मक भूमिका अधोरेखित झाली आहे. तसेच, भविष्यातही अशा कल्याणकारी निर्णयांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. एकूणच, सावंतवाडी नगर परिषदेचा हा निर्णय कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

You cannot copy content of this page