सावंतवाडीत नळपाणी व गॅस पाईपलाईन कामाचा बोजवारा; नागरिकांचा संताप उसळला…

खणून ठेवलेल्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य, निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा, २६ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.२०-: शहरातील जुनाबाजार आणि माठेवाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खणून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आलेत. या परिसरातील जागरूक नागरिकांनी नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत जाब विचारला. चुकीच काम करणाऱ्या ठेकेदारासह नगरपरिषद अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. यावेळी कामात चुक झाल्याचे त्यांनी मान्य केले. धुळीच साम्राज्य निर्माण झाल्याने तात्काळ हे रस्ते सुस्थितीत आणण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

माठेवाडा व जुनाबाजार परिसरातील या कामामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्ते खोदल्यामुळे आणि नळाच्या पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाने खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरणाचा घाट घातला जात असल्याचे लक्षात येताच, रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत हे काम थांबवले. विरोधी नगरसेवक देव्या सूर्याजी व देवा टेमकर यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागावर ताशेरे ओढले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कंत्राटदाराकडून बोगस काम होत असून धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहेत. २६ मार्चपर्यंत खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले नाही, तर २७ मार्चपासून कोणतेही काम चालू देणार नाही. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन आणि कंत्राटदार सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला. तसेच स्थानिक नगरसेवक, सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही ठेकेदार, अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. निवृत्त अभियंता मंगेश चिटणीस यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तांत्रिक बाबींकडे लक्ष वेधत कामातील त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली असता, कामाचा दर्जा सुमार असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची सत्ताधारी नगरसेवक आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्यासह नागरिकांनी भेट घेत कारभाराबाबत खडेबोल सुनावले. लोकांना होणारा त्रास दुर करण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवक देव्या सुर्याजी, देवा टेमकरांसह नागरिकांनी धुळीच्या साम्राज्यामुळे होणारे हाल बघता मुख्याधिकारी यांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. चांगल्या दर्जाचं काम अन् आताची परिस्थिती सुधारली नाही तर विपरीत परिस्थितीत निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, देवेंद्र टेमकर, न.प. बांधकाम अधिकारी तुषार सरडे, मनोज राऊळ, रहिवासी लक्ष्मीकांत डुबळे, अवधूत नार्वेकर, विकास गोवेकर, संजय चिटणीस, बंड्या कुलकर्णी, गौरेश कुमठेकर, गौरांग चिटणीस, बबलू मिशाळ, ॲड. प्रथमेश प्रभू, सतीश नार्वेकर, किशोर चिटणीस आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page