तीन जनरेटर वैभववाडी तालुक्यास प्राप्त; सेनेच्या माध्यमातून नुकसान ग्रस्तांना सिमेंट पत्र्याचेही केले वाटप*
*💫वैभववाडी दि.२१-:* वैभववाडी तालुक्याला तीन जनरेटर प्राप्त झाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी या जनरेटरची घोषणा केली होती. त्याची तत्काळ पूर्तता करण्यात आली आहे. शिवाय शिवसेनेच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना सिमेंट पत्र्यांचेही वाटप करण्यात आले आहे. चक्रीवादळाने सर्वांचीच दयनीय अवस्था झाली. या चक्रीवादळाने वीज वितरण कंपनीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे चार दिवस तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. खंडित वीज पुरावठ्यामुळे तालुक्यातील अनेक नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्या. बाहेर तुफान पाऊस असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली. चक्रीवादळाचा आढावा घेताना ही बाब पालकमंत्री सामंत यांच्या निदर्शनास आली. त्यांनी नाधवडे येथील पाहणी दौऱ्यादरम्यान तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदार संघात तीन जनरेटर देण्याची घोषणा केली होती. ज्या गावांमध्ये आठ दिवस वीज पुरवठा खंडित असेल अशा गावांच्या नळपाणी पुरावा योजना या जनरेटर वर सुरू करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री सामंत यांच्या घोषणेनंतर काही तासांतच तीनही जनरेटर वैभववाडी तहसीलदार कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय काही अंशी कमी करण्यात यश आले. त्याच बरोबर पालकमंत्री सामंत व खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी वैभववाडी दौऱ्यात नुकसान ग्रस्तांना शिवसेनेच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. चक्रीवादळाने तालुक्यात सुमारे ६८९ मालमत्तांचे नुकसान झाले होते. अनेकांच्या राहत्या घराची कौले, सिमेंट पत्रे तुटून नुकसान झाले होते. शिवसेनेच्या वतीने एक ट्रक पत्रे मागविण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील गरीब नागरिकांना गुरुवारी या सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले. सेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुका प्रमुख मंगेश लोके, तहसीलदार रामदास झळके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, सुनील रावराणे, यांच्या उपस्थितीत या पत्र्याचे वाटप करण्यात आले.
