परशुराम उपरकर :जिल्हा गाबीत समाजतर्फे नवनिर्वाचित पं. स. सदस्य, नगरसेवकांचा सत्कार..
⚡मालवण ता.२४-:
जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी गाबीत समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा उपयोग करावा. राजकारणात गाबीत समाजाची ताकद व प्रभाव वाढला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केले.
गाबीत समाज, सिंधुदुर्गतर्फे मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये नुकताच गाबीत समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा झाला. त्यावेळी परशुराम उपरकर हे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर त्यांच्यासमवेत कार्याध्यक्ष रतनकुमार झाजम, गाबीत समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरी खोबरेकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सुदेश आचरेकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी उपसभापती विलास ताम्हणकर, जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, वेंगुर्ल्याचे मच्छीमार नेते वसंत तांडेल, शिरोडा विभागाचे बाबा नाईक, लक्ष्मीकांत खोबरेकर, देवगडचे सरचिटणीस लक्ष्मण तारी, उपाध्यक्ष रमेश तारी, महिला बालविकास सभापती अन्वेषा आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, रेडी पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका घाटवळ यांना सन्मानित करण्यात आले. तर नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचा सत्कार त्यांच्या पत्नी ज्योती तोरसकर यांनी, तर मुंबईच्या नगरसेविका शिल्पा केळुसकर यांचा सत्कार त्यांचे सासरे आबा केळुसकर यांनी स्वीकारला. जिल्हा बँकेत संचालक मेघनाद धुरी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रशेखर उपरकर म्हणाले, जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ले व देवगडच्या किनारी भागात गाबीत समाजाची मोठी वस्ती आहे. जेथे गाबीत समाजाचे मोठे वास्तव्य आहे तेथे निवडणुकांमध्ये समाजाचे प्राबल्य असणे महत्वाचे आहे. निवडणुकांमध्ये एकजुटीने समाजाने आपली ताकद दाखविली पाहिजे. आज किनारपट्टीवरील मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांना बांधकामविषयक नोटिसा प्रशासनाकडून आल्या आहेत. हे सर्व गाबीत बांधवच असून नोटिसांविरुद्धच्या लढ्यात आपण गाबीत समाज म्हणून एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे, यासाठी गाबीत समाज संघाचे सहकार्य लाभेल. असेही ते म्हणाले..
यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित सदस्य व नगरसेवक यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी समाजाकडून झालेल्या सत्काराने आपण भारावून गेलो असल्याच्या भावना व्यक्त करत समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते बाबी जोगी, मालवण गाबीत समाजाचे खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य पवनकुमार पराडकर, राधिका कुबल, दीक्षा ढोके, अनुष्का मालंडकर, केरकर बंधू, अतुल मालंडकर, पूजा सरकारे, व्यसनमुक्ती मंचचे दिनकर शेलटकर, गाबीत समाज कार्यकर्ते संजय केळुसकर, केतन जोशी आदी समाज बांधव उपस्थित होते.
