भारतीय किसान संघाच्यावतीने शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…

⚡सावंतवाडी ता.२४-: भारतीय किसान संघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ओरोसबस स्टँड स्थानक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण ऊर्फ बाळा धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे
या प्रसिद्धीपत्रकात धुरी यांनी म्हटले आहे की, भारतीय किसान संघाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच हा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
ई-पिक पाहणी अ‍ॅप मधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याबद्दल शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यात यावा, मनरेगा अंतर्गत प्रलंबित प्रकरणांना त्वरित मंजुरी देण्यात यावी, भात खरेदी केंद्रांवर तुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पावतीपेक्षा जास्त भात घेतला जात असल्याच्या तक्रारी असून, यावर कारवाई करावी, तसेच भात खरेदी केंद्रे १ डिसेंबरपूर्वी सुरू करावीत आणि प्रति गुंठा भात खरेदीची मर्यादा वाढवावी, सोलार पंप नादुरुस्त असणे व सोलार शेती पंप सवलतींचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वन फेज व थ्री फेज वीज जोडणी देण्यात यावी तसेच सोलार पंपाची सबसिडी तात्काळ देण्यात यावी, अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत शेतीला होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवासाठी तातडीची उपाययोजना राबविण्यात यावी, हवामान बदलामुळे काजू व आंबा पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पिक विम्यात योग्य प्रकारे समावेश करण्यात यावा, गोसखी / गोसखा यांना देशी गोवंश पालनासाठी प्रोत्साहन निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, “शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रश्न स्वतः सोडविण्यासाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे” असे आवाहन भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केले असल्याचे धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page