पर्यावरणप्रेमींना सहभागाचे आवाहन:२१, १० व ५ किमी स्पर्धांसह रोख पारितोषिके; विविध संस्था, सामाजिक संघटना व पत्रकारांचे मोलाचे योगदान
⚡आंबोली, ता.०१-: सह्याद्री एडवेंचर अॅडव्हेंचर ग्रुप आंबोली-सांगली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मानसून मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध संस्था, सामाजिक संघटना, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक तसेच पत्रकार व सोशल मीडियाचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष बाबल अलमेडा यांनी दिली.
या मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी केएसआर ग्रुप, केसरी दीपक केसरकर मित्र मंडळ, विशाल सेवा फाउंडेशन, संजू परब मित्र मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, राणे हॉस्पिटल (कुडाळ), सावंतवाडी पॅलेस तसेच आंबोली व चौकूळ परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सहकार्य केले आहे. याशिवाय सावंतवाडी व कुडाळ येथील पत्रकार बंधू तसेच सोशल मीडियाचेही विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
ही स्पर्धा जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित क्रीडा आणि पर्यटन उपक्रम म्हणून उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असून, जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे व स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबल अलमेडा यांनी केले आहे.
