Headlines

सावंतवाडीत उद्या नरकासुर स्पर्धेचा रंगणार थरार…

महाकाय प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर; भाजपा युवा मोर्चाचा पुढाकार, विशाल परब यांचे प्रायोजन,खुला व बालगटासाठी स्वतंत्र स्पर्धा; रील स्पर्धेचेही आयोजन..

⚡सावंतवाडी, ता. ६-: दीपावलीच्या उत्सवाला सांस्कृतिक रंगत देण्यासाठी सावंतवाडीत उद्या, शनिवार ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकारातून आणि भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रायोजनातून होणाऱ्या या स्पर्धेत नरकासुरांच्या महाकाय व आकर्षक प्रतिकृतींचे दर्शन घडणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित असलेल्या या स्पर्धेमुळे शहरात दीपावलीचा उत्साह अधिकच वाढणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून, भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद राऊळ व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोती तलाव परिसरातील अमूल आईस्क्रीमसमोरील कॉर्नरवर, शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ हा सोहळा रंगणार आहे.

स्पर्धेत केवळ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांना सहभागी होता येणार असून, खुला गट आणि बालगट अशा दोन स्वतंत्र गटांत स्पर्धा होईल. नरकासुराच्या प्रतिकृतींची कलात्मकता, कल्पकता, रंगसंगती, आकर्षक मांडणी आणि सांघिक कौशल्य यांचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी स्वतंत्र रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांनी दिली.

कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

नरकासुर स्पर्धा ही केवळ प्रतिकृतींचे प्रदर्शन नसून युवकांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. दीपावलीशी जोडलेली ही पारंपरिक सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजपा युवा मोर्चाने हा उपक्रम हाती घेतला आहे. बालगटाच्या सहभागामुळे लहान मुलांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तर रील स्पर्धेमुळे पारंपरिक उत्सवाला डिजिटल माध्यमांची जोड मिळणार आहे.

क्रीडा, आरोग्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम

युवकांच्या ऊर्जेला विधायक दिशा देण्याच्या उद्देशाने भाजपाकडून सावंतवाडीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तीन दिवसांपूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून व्यायाम आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर आता नरकासुर स्पर्धेच्या माध्यमातून कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर केला जाणार आहे. क्रीडा, आरोग्य आणि संस्कृती या तीनही क्षेत्रांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमुळे स्थानिक युवकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे.

या स्पर्धेला सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि दीपावलीच्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क

इच्छुक स्पर्धकांनी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक (मो. ८२९१४९४८९७) किंवा पंकज तुळसुलकर (मो. ९१३०६८३४७२) यांच्याशी उद्या सकाळी १० वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page