गोकुळमधील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन ; सुशांत नाईक यांचा सरकारवर घणाघात..

⚡कणकवली ता.०६-: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने कणकवलीत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. ‘गोकुळ वाचवा, सहकार वाचवा, लोकशाही वाचवा’ असा संदेश देत कणकवली येथील ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर काळे फलक हातात घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
यावेळी ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय!’, ‘गोकुळ वाचवा, सहकार वाचवा, लोकशाही वाचवा’, ‘सरकारमधील लोकशाहीचा अवमान करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.निवडणूक झाल्यानंतर तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार कशासाठी?
आंदोलनादरम्यान बोलताना सुशांत नाईक यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने गोकुळमध्ये चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्याचा आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणित सहकार पॅनेलने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १३ संचालक निवडून आले, तर महायुतीचे १२ संचालक विजयी झाले.
अशा परिस्थितीत गोकुळच्या अध्यक्षपदावर महाविकास आघाडीचा उमेदवार विराजमान होण्याची शक्यता असताना सरकारने चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, निकाल लागला, तरी त्यानंतर अशा प्रकारे निर्णय घेण्याची गरज काय? मग निवडणूक घेण्याचा उद्देश तरी काय, असा सवाल सुशांत नाईक यांनी उपस्थित करत निषेध निषेध आंदोलनाल केले यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजू राठोड, प्रथमेश सावंत, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, कळसुली विभागप्रमुख बबली ऊर्फ चंद्रहास राणे, रुपेश आमडोसकर, प्रमोद सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक राजू शेट्टी, दिलीप मोरये, विलास गुडेकर, वैदही गुडेकर, अजित काणेकर, प्रसाद चव्हाण, संकेत कुडतरकर, माधवी दळवी, संजना कोलते, ललित घाडीगावकर, अवि सावंत, जय शेट्टी, आबू मेस्त्री आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
