Headlines

१२ तोळे सोन्याच्या चोरीप्रकरणी कणकवलीतील संशयित दाम्पत्य ताब्यात

सावंतवाडी एसटी स्थानकावरील चोरीचा एलसीबीकडून उलगडा:सोन्याचे दागिने कर्नाटकात ठेवल्याची माहिती..

⚡कुडाळ ता.०६-: सावंतवाडी बसस्थानकावर प्रवाशाचे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या पती-पत्नीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. संशयित दीपक संतोष सकट (वय २७) आणि संशयित अमृता दीपक सकट (वय २१, दोघेही रा. एस. एम. हायस्कूलमागे, किनई, कणकवली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून सकट दाम्पत्याचा या चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ आणि त्यांच्या पथकाने ६ नोव्हेंबर रोजी गडनदीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेले १२ तोळे सोन्याचे दागिने कर्नाटक येथे ठेवल्याची माहितीही त्यांनी तपासात दिली आहे. हे दागिने हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
दोन्ही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला पोलीस हवालदार रुपाली खानोलकर, पोलीस हवालदार जॅकसन घोन्सालवीस आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

You cannot copy content of this page